संस्कृत भाषेतील एक सुंदर सुभाषित आहे..
विद्या विवादाय धनम् मदाय खलस्य शक्ती परपीडनाय।
साधोस्तु सर्वम विपरिमेतद ज्ञानाय दानाय च रक्षणाय।।
म्हणजे दुर्जन माणसाचे ज्ञान इतरांशी वाद घालण्यासाठी, पैसे माजमहिने करण्यासाठी आणि शक्ती दुर्बल जनतेला त्रास देण्यासाठी वापरली जाते.
तर सज्जनांचे ज्ञान इतरांना वाटण्यासाठी, पैसे सत्पात्री दान करण्यासाठी आणि शक्ती निर्बलांचे रक्षण करण्यासाठी वापरली जाते.
विचार करून पहा.. आजही समाजात हेच घडत नाही का?
मनुष्य कसाही असो... सुशिक्षित असो की अशिक्षित, नोकरीवाला किंवा व्यावसायिक, स्त्री अथवा पुरुष, शहरी अथवा खेड्यातील, राजकारणी अथवा सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील असो...
सगळ्या माणसांची ढोबळमानाने वर्गवारी केवळ सज्जन आणि दुर्जन अशीच करता येते. मनुष्य हुद्याने, पैशाने, सामाजिक पदाने कुठल्याही स्तरावर असो, त्याची मानसिक स्थिती ही केवळ दुर्जन आणि सज्जन अशीच असते...
आणि सज्जन हा कसाही असो, वरील विभागातील कुठल्याही स्तरावरचा.. तो समाजाचे हितच पाहतो.. आणि हितच करायचा प्रयत्न करतो..
आणि दुर्जन कुठल्याही प्रकारचा असो तो समाजाला त्रासच द्यायचा प्रयत्न करतो..
उदाहरण बघा तर.. आजही खेड्यात जुने जाणते म्हातारे असतात.. घराघरात झालेली भांडण मिटवण्याचे काम करतात.. दोघांनाही समजावून सांगून त्यांचे प्रपंच सुरळीत लावायचे प्रयत्न करतात.. ते बरेच वेळा अशिक्षित असतात तरीही करतात समाजाचे भलेच...
आणि कित्येक शिकलेली माणसे गावात,भावभावात भांडणे लावायची कामे करून आपले स्वार्थ साधतात..
एखादा सज्जन असेल अन कायद्याचा जाणकार असेल तर तो लोकांच्या समस्या कशा लवकर सुटतील याचा विचार करतो, तर एखादा जाणकार दुर्जन केवळ लोकांना अडचणीत कसे आणता येईल याचीच वाट पाहतो..
एखादा सज्जन डॉक्टर म्हणजे तात्याराव लहाने सरांसारखा माणूस लाखभर अंध लोकांना दृष्टी देण्याचे काम करतो... तर म्हैसाळ चा क्रूरकर्मा डॉ खिद्रापूरे कित्येक पोरींचे गर्भ आईच्या पोटातच खुडून मोकळा होतो...
उलट असे म्हणावे लागते की एखादा सज्जन जर अशिक्षित असेल तर तो समाजाचे थोडे हित करतो.. पण जर तो सुशिक्षित असेल तर अधिक हित करतो...
तद्वतच एखादा दुर्जन अशिक्षित असेल तर तो समाजाचे कमी नुकसान करील.. पण जर दुर्जन सुशिक्षित असेल तर तो समाजाचे अधिक प्रमाणात नुकसान करतो...
कार्तिकी वारीत ज्ञानोबारायांच्या नगरीत आमच्या एका व्यवसायबंधूशी चर्चा करताना सुचलेले काहीसे तुमच्यासोबत शेअर करतोय...
अन माऊलींच्याच शब्दांत त्यांच्यासाठी मागणे मागतो..
जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो। भूतां परस्परे जडो। मैत्र जीवांचे।।
सुप्रभात सर्वांना!!